रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांची जबाबदारी; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
रत्नागिरी : Purushottam Karandak 2026 साठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठेच्या ‘पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तीन जिल्ह्यांच्या “समन्वयक” (Co-ordinator) पदी डॉ. आनंद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. आंबेकर हे रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) च्या ‘डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’चे विभागप्रमुख म्हणून गेली २७ वर्षे कार्यरत आहेत.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीत ‘महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे’ या संस्थेचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. संस्थेच्या वतीने १९६३ पासून पुणे विद्यापीठ स्तरावर “पुरुषोत्तम करंडक” आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जात आहे. २०१० सालापासून या स्पर्धेचा विस्तार करण्यात आला असून पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती अशा पाच केंद्रांवर ही स्पर्धा आयोजित केली जाते.
या पाचही केंद्रांवरील पारितोषिक विजेत्या एकूण २० संघांची दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यात ‘राज्यस्तरीय महाअंतिम फेरी’ पार पडते. विशेष म्हणजे, या महाअंतिम स्पर्धेचा संपूर्ण खर्च कोणत्याही प्रायोजकाशिवाय ‘महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे’ ही संस्था स्वतः करते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या या सांस्कृतिक चळवळीत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयक निवडीनंतर करण्यात आले आहे.
डॉ. आनंद आंबेकर यांची ही नियुक्ती ‘महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे’चे चिटणीस श्री. राजन ठाकूरदेसाई आणि खजिनदार श्री. सुहास नांगरे यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, कलोपासक पुणेचे कार्यकर्ते व र. ए. सोसायटीचे कार्यकारी सदस्य डॉ. संजय केतकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तसेच उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये आणि डॉ. सीमा कदम यांनी डॉ. आंबेकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:00 30-07-2026













