जंतरमंतरवरील आंदोलकांचा खरपूस समाचार; ‘अकंपनी अक्की’ पॉडकास्टवरील विधानाने खळबळ
मुंबई : Actor Sudesh Berry On PM Narendra Modi संदर्भात ९० च्या दशकातील गाजलेला ‘बॉर्डर’ सिनेमा आणि ‘सुराग’ मालिकेतील अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते सुदेश बेरी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’वर (CJP) अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. ‘अकंपनी अक्की’ या पॉडकास्टवर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली असून, मोदी हे सामान्य माणूस नसून प्रत्यक्ष ‘भगवान विष्णूचा अवतार’ असल्याचे वक्तव्य केले आहे.
पॉडकास्टदरम्यान सुदेश बेरी यांनी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर आणि ‘CJP’ च्या सदस्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी या आंदोलकांना ‘टवाळखोर, भिकारी आणि निष्क्रिय’ असे संबोधत, या लोकांकडे कोणतीही प्रतिष्ठा किंवा दर्जा उरलेला नाही असा घणाघात केला. “जंतरमंतरवर उभे राहून नवी पार्टी काढणारे लोक देशासाठी काहीही करत नाहीत. ते फक्त देशाला अधोगतीकडे नेत आहेत,” असा आरोपही बेरी यांनी केला.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी CJP च्या अध्यक्षांनी फोन केल्याचा दावाही सुदेश बेरी यांनी यावेळी केला. “आम्ही जुने मित्र आहोत; CJP च्या अध्यक्षांनी मला फोन करून चळवळीत सहभागी होण्याची विनंती केली होती. मात्र, मी त्यांचा फोन कट करून त्यांना ब्लॉक केले. माझ्याकडे अशा निरुपयोगी गोष्टींसाठी पैसे, वय किंवा मानसिकता नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना सुदेश बेरी म्हणाले, “नरेंद्र मोदींनी देशात रामराज्य आणले आहे. त्यांच्या चहाचा सुगंध आज संपूर्ण जगाला भारावून टाकणारा ठरला आहे. पण आपल्याच देशातील काही लोक कोणत्याही कारणाशिवाय त्यांच्यावर टीका करतात. इंग्रजी बोलणाऱ्या या लोकांना हिंदीतील काना-मात्राही नीट ठाऊक नाही. बिचाऱ्या मोदींनी तुमचे काय बिघडवले आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपली भावना व्यक्त करताना बेरी शेवटी म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींना वैयक्तिकरीत्या ओळखत नाही. परंतु, जसे आपण देवाला न पाहता त्याची पूजा करतो, तसाच मी मोदीजींचा आदर करतो. मला एकदा तरी मोदीजींचे पाय धुऊन ते पाणी पिण्याची तीव्र इच्छा आहे.” सुदेश बेरी यांच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 30-07-2026













