NEET Paper Leak Issue: ‘आता माझा रोल बदललाय..’ नीट पेपरफुटीवरील मौनावर भाजप खासदार राघव चड्ढांचे स्पष्टीकरण; पंतप्रधान मोदींचे कौतुक करत म्हणाले..

NEET Paper Leak Issue: पेपर माफिया स्वप्नातही थरथर कापेल; राघव चड्ढांचा संसदेत दावा

नवी दिल्ली: NEET Paper Leak Issue संदर्भात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षातून निवडून आलेले आणि आता भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेले राघव चड्ढा यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आपल्या दीर्घ मौनाचे कारण अखेर स्पष्ट केले आहे. संसद भवनात बोलताना त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षात असताना प्रश्न विचारणे हे माझे काम होते, परंतु आता सत्ताधारी पक्षाचा भाग असल्याने माझी जबाबदारी केवळ प्रश्न विचारण्याची नसून ठोस उपाययोजना करण्याची आहे.

“तुमचा राग रास्त; पंतप्रधानांनी पालकांप्रमाणे ऐकले” नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना खासदार राघव चड्ढा म्हणाले, “विद्यार्थ्यांचा राग, त्यांच्या भावना आणि दुःख पूर्णपणे रास्त आहे. जेव्हा विद्यार्थ्यांनी आपले दुःख व्यक्त केले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पालकाप्रमाणे ते ऐकून घेतले आणि संपूर्ण व्यवस्थेत बदल घडवून आणला. आमच्या सरकारने पहिल्यांदाच पेपरफुटीविरोधात इतकी मजबूत आणि कडक कायदेशीर चौकट तयार केली आहे.”

आता OMR ऐवजी संगणकावर होणार नीट परीक्षा पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती देताना चड्ढा यांनी सांगितले की, अवघ्या ७५ दिवसांत जलदगती न्यायालयात (Fast-Track Court) आरोपपत्र दाखल करण्यात आले असून तपासात कोणताही विलंब केला गेला नाही. तसेच, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढील नीट परीक्षा OMR शीटऐवजी पूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे (Computer-Based Test) घेतली जाणार आहे. गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण व्हावी आणि कोणताही माफिया पेपरफुटीचा विचार करून स्वप्नातही थरथर कापेल, असा कडक कायदा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटी हा ‘अखिल भारतीय संघटित गुन्हा’ आपल्या भाषणात राघव चड्ढा यांनी उत्तरदायित्व आणि नैतिकतेचा मुद्दा अधोरेखित केला. पेपरफुटी ही कोणत्याही एका राज्यापुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नसून तो एक ‘जुनाट आजार’ आणि ‘अखिल भारतीय संघटित गुन्हा’ आहे. या संदर्भात पंजाबचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, १९ जुलै २०२६ रोजी पंजाबमध्ये पार पडलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेत ब्लूटूथ उपकरणांद्वारे १३ लाख रुपयांपर्यंत पैसे घेऊन मोठ्या प्रमाणावर कॉपी पुरवणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या विश्वासासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 31-07-2026