केएफसी परिसरातील जीवघेणे खड्डे आणि मॅनेजरच्या जाचक अटींविरुद्ध डिलिव्हरी बॉईज आक्रमक; मागण्या मान्य झाल्यावर संप मागे
रत्नागिरी: Ratnagiri Swiggy Zomato Strike संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉईजमध्ये प्रलंबित मागण्या व प्रशासनाच्या जाचक अटींमुळे तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या त्रासाला कंटाळून डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी तातडीने मध्यस्थी करत रेस्टॉरंट व कंपनी प्रशासनाला कडक इशारा दिला आणि डिलिव्हरी बॉईजचे प्रश्न तातडीने मार्गी लावले.
केएफसी रेस्टॉरंटमधील खड्ड्यांमुळे अपघात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यामागे शहरातील ‘केएफसी’ (KFC) रेस्टॉरंटमधील दुरवस्था हे मुख्य कारण होते. रेस्टॉरंटच्या मुख्य गेटपासून ते डिलिव्हरी पिकअप काउंटरपर्यंतच्या फ्लोअरिंगवर तीन माणसे एकाच वेळी पडतील एवढे मोठे आणि भयानक खड्डे पडले होते. ऑर्डर पिकअप करण्यासाठी जाताना या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक डिलिव्हरी बॉईज पडून गंभीर जखमी झाले होते. या समस्येबाबत वारंवार सांगूनही व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी संपाचे हत्यार उपसले.
स्विगी मॅनेजरचा सुट्ट्यांवर गदा आणणारा जाचक फतवा दुसरीकडे, स्विगी कंपनीच्या स्थानिक प्रबंधकाने कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा आणणारा एक जाचक फतवा काढला होता. आजारपण किंवा कोणतीही तातडीची आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये, अशी सक्ती केली जात होती. तसेच, कोणी सुट्टी घेतल्यास त्याच्या जागी नवीन भरती केली जाईल, अशी थेट धमकी मॅनेजरकडून दिली जात होती. जुन्या आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा आणण्याचा हा प्रशासकीय डाव असल्याचा गंभीर आरोप डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी केला.
युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची आक्रमक मध्यस्थी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसाद सावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट केएफसी रेस्टॉरंट गाठले आणि तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली. सावंत यांच्या कडक भूमिकेनंतर मॅनेजरने तातडीने नमते घेत डिलिव्हरी बॉईजचा पिकअप पॉईंट तात्पुरत्या स्वरूपात बदलून दिला. तसेच खड्डे असलेल्या फ्लोअरिंगचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर करण्याचे आश्वासन दिले.
स्विगी व्यवस्थापनाला कडक तंबी; कर्मचाऱ्यांना दिलासा त्यानंतर प्रसाद सावंत यांनी ‘स्विगी’च्या मॅनेजरची भेट घेऊन कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम भरला. युवासेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे स्विगीच्या मॅनेजरला झुकावे लागले. कोणत्याही डिलिव्हरी कर्मचाऱ्यावर यापुढे अन्याय होणार नाही आणि सुट्टीच्या कारणावरून कोणालाही कामावरून काढले जाणार नाही, अशी लिखित व तोंडी हमी व्यवस्थापनाने दिल्यानंतर डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 31-07-2026













