Ratnagiri Mangrove Conservation Award: नाचणे-नारायणमळीच्या ‘नवलाई निसर्ग पर्यटन गटाला’ राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार; वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गौरव

कांदळवन संवर्धन आणि निसर्ग पर्यटनातून १० लाखांहून अधिक उत्पन्न; ७५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मान

रत्नागिरी: Ratnagiri Mangrove Conservation Award संदर्भात प्राप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडलेल्या ‘कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा-२०२६’ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याने विशेष ठसा उमटवला आहे. कोकणातील कांदळवन संवर्धन आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्माण करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील नाचणे-नारायणमळी येथील ‘नवलाई निसर्ग पर्यटन गटाला’ राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

७५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरव महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या दिमाखदार सोहळ्यास वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांसह वन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक उपजीविका आणि कांदळवन संवर्धनाचा आदर्श महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत २०१७ पासून राबवण्यात येणाऱ्या ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ योजनेअंतर्गत नाचणे गावात नारायणमळी येथे ‘कांदळवन सह-व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली होती. याअंतर्गत महिला व पुरुषांचा एकत्र समूह करून ‘नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन गटाची’ निर्मिती करण्यात आली.

एका वर्षात ३५०० हून अधिक पर्यटक; १० लाखांचे उत्पन्न गटातील सदस्यांना कांदळवन ओळख, पक्षी निरीक्षण, जीवरक्षक प्रशिक्षण आणि सुरक्षाविषयक सखोल कार्यशाळा दिल्यानंतर मार्च २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून ३५०० पेक्षा जास्त पर्यटकांनी या पर्यटन स्थळाला भेट दिली. याद्वारे नवलाई निसर्ग पर्यटन गटाला १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असून स्थानिकांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

मान्यवरांची उपस्थिती व सदस्यांची प्रतिक्रिया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवलाई गटाचे अध्यक्ष दीपक गझने, कांदळवन समिती अध्यक्ष तथा नाचणेचे सरपंच भैया भोंगले, सचिव किरण पाचारणे, उपजीविका तज्ज्ञ वैभव बोंबले, प्रकल्प समन्वयक स्वस्तिक गावडे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर, “कांदळवन ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग पर्यटनाचा ताळमेळ साधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे,” अशी भावना गटाच्या सदस्यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 31-07-2026