पदपथांवरील चालण्याच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना प्राधिकरणाकडे भरपाई मागण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court Encroachment Free Roads संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्देश दिला आहे. देशातील प्रत्येक रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य आणि संपूर्णपणे अतिक्रमणमुक्त जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच पादचाऱ्यांसाठी जागा निश्चित करणे आणि त्या जागेवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची काटेकोर खात्री करण्याचे स्पष्ट आदेशही न्यायालयाने जारी केले आहेत.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. “कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा खर्चिक बांधकाम न करता, चालणाऱ्यांसाठी योग्य जागा चिन्हांकित (Mark) करा. जिथे जिथे रस्ता आहे, तिथे चालण्यासाठी सुरक्षित जागा असलीच पाहिजे. दोरी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून हे चिन्हांकन करा आणि त्यावर कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घ्या,” असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
प्राधिकरणाकडे भरपाई मागण्याचा नागरिकांना हक्क
सुनावणीदरम्यान न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत म्हटले की, महापालिका, नगरपालिका आणि पंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की त्यांनी पदपथ बांधणे, त्यांची योग्य देखभाल करणे आणि त्यांना अतिक्रमणांपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. पदपथांवरील नागरिकांच्या सुरक्षित चालण्याच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास, संबंधित नागरिक जबाबदार प्राधिकरणांविरुद्ध कायदेशीर दावा ठोकू शकतात आणि नुकसानभरपाईचा हक्क मागू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारला संबंधित स्थानिक प्रशासने व प्राधिकरणांना या निर्देशांनुसार अंमलबजावणीचे आदेश देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणांना आळा बसण्याची आणि पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 04-08-2026














