डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली केंद्र सरकारचा निर्णय; केजरीवाल यांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल
Arvind Kejriwal E20 Protest मुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारच्या ‘ई-२०’ (E-20/Ethanol Blended Petrol) या इथेनॉल-मिश्रित इंधन धोरणाविरोधात उठलेला संतापाचा सूर आता देशभरात पसरला असून, याच मुद्द्यावर आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे निघालेला आम आदमी पक्षाचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी फिरोजशाह रोडवर अडवला.
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी केजरीवाल यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोर्चा अडवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन देशातील जनतेवर जबरदस्तीने ई-२० इंधन लादत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या धोरणाचा फायदा भारतीय शेतकरी किंवा नागरिकांना होण्याऐवजी अमेरिकन शेतकऱ्यांनाच जास्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
केजरीवाल यांनी सांगितले की, “देशभरात इथेनॉल लागू करणे हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा हरदीप सिंग पुरी यांच्या स्तरावरील केवळ एक निर्णय नाही, तर तो पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. २.३३ लाखांहून अधिक लोकांनी या इथेनॉल धोरणाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून विरोध नोंदवला आहे. सरकारने कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता नागरिकांना पूर्वीप्रमाणे शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे.”
३० कोटी वाहने नादुरुस्त होण्याचा आपचा दावा
यावेळी आपचे नेते अनुराग धांडा यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. “ई-२० इंधनामुळे देशातील सुमारे ३० कोटी वाहने नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. नागरिक या इंधनामुळे त्रस्त झाले आहेत. मात्र, पंतप्रधान कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नाहीत. अमेरिकेतील शिल्लक इथेनॉल भारतावर लादले जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्या दबावाला बळी न पडता तातडीने या धोरणाचा पुनर्वचार करावा, अशी मागणी करत आप पक्षाचा हा लढा आणि संघर्ष असाच सुरू राहील, असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 04-08-2026














