Ratnagiri ZP Education Department: प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी किरण लोहार यांची नियुक्ती; सीईओ वैदेही रानडे यांचे आदेश

रत्नागिरी जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभरापासून प्रभारी पदावरच कारभार सुरु; पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त कार्यभार सोपवला

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते या सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी मंगळवारी हे आदेश काढले आहेत. अद्याप रत्नागिरी जिल्हा परिषदेला पूर्णवेळ प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळालेला नसून प्रभारी पदावरच कामकाज सुरू आहे.

गेल्या वर्षभरापासून शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी कारभार

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज गेल्या वर्षभरापासून प्रभारी पदांवरच चालत असल्याचे समोर आले आहे. मागील जून महिन्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांची बदली झाल्यानंतर हे महत्त्वाचे पद सहा महिने रिक्त होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात सिंधुदुर्गच्या निलिमा नाईक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला, मात्र चार महिन्यांनंतर त्या सेवानिवृत्त झाल्या. नाईक यांच्या निवृत्तीनंतर सुनीता शिरभाते यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती, परंतु दोन महिन्यांनंतर त्याही निवृत्त झाल्यामुळे हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले होते.

चर्चेला पूर्णविराम; किरण लोहार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

सुनीता शिरभाते यांच्या निवृत्तीनंतर या पदासाठी उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार या दोघांची नावे शर्यतीत होती. अखेर प्रशासनाकडून या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून किरण लोहार यांच्यावर या पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. लोहार यांनी आपल्या मूळ पदाचे काम पाहून शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 05-08-2026