Ratnagiri Fagarwathar Road: रत्नागिरी वरचा फगरवठार रस्ता लवकर पूर्ण करा; पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रस्ता खचल्याच्या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना

रत्नागिरी: Ratnagiri Fagarwathar Road (रत्नागिरी वरचा फगरवठार रस्ता): बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीमुळे रत्नागिरी शहरातील परटवणे ते वरचा फगरवठार भागाकडे जाणारा खचलेला रस्ता तातडीने पूर्ववत करावा आणि या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी सक्त ताकीद जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

पालकमंत्री सामंत यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. परटवणे ते वरचा फगरवठार या मार्गालगत एका बांधकाम व्यावसायिकाने डोंगराळ जागा सपाट करताना संरक्षक भिंतीखालील जागा पोखरणे सुरू केले होते. यामुळे ही संरक्षक भिंत पहिल्याच पावसाळ्यात ढासळली होती. त्यानंतर पुन्हा संरक्षक भिंत बांधताना हा भाग जास्त खोदला गेल्याने सुमारे ३० मीटरहून अधिक रस्ता कोसळून पूर्णपणे नामशेष झाला. सध्या तेथे पायवाट राहावी एवढाच डांबराचा भाग शिल्लक राहिला आहे.

नागरिकांना दोन-तीन किलोमीटरचा वळसा; कामावर जाण महिलांसाठी धोकादायक

रस्ता खचल्यामुळे वरचा फगरवठार परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवासासाठी सुमारे २ ते ३ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा मारावा लागत आहे. त्यातच दररोज कामासाठी जाणारा महिलावर्ग धोका पत्करून याच ठिकाणाहून ये-जा करत आहे.

शुक्रवारी पालकमंत्री घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक संतप्त नागरिकांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या मित्राला चांगलेच धारेवर धरले होते. पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी सविस्तर चर्चा केली.

भिंत बांधकामाची रोजची माहिती देण्याचे न. प. अधिकाऱ्यांना निर्देश

पाहणीदरम्यान ना. सामंत यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. भिंतीच्या बांधकामाची रोजची माहिती प्रशासनाने स्वतःकडे ठेवावी आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी निर्देश दिले. तसेच, या बेजबाबदार प्रकाराची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले.

या पाहणी प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, स्थानिक नगरसेवक व पाणी सभापती निमेष नायर, नगरसेवक वैभवी खेडेकर, प्रीती सुर्वे, नितीन जाधव, शिवसेना पदाधिकारी आणि नगर अभियंता यतिराज जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 08-08-2026