Ratnagiri ST Bus Booking: रत्नागिरी विभागातर्फे परतीसाठी २,५०० बसेसचे नियोजन; गट आरक्षणास आजपासून प्रारंभ

गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासह परतीच्या प्रवासासाठी आरक्षण खुले


Ratnagiri ST Bus Booking: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि सण संपल्यानंतर मूळ गावाहून परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) रत्नागिरी विभागाने मोठे नियोजन केले आहे. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागाकडून तब्बल २,५०० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठीचे आरक्षण खुले झाले आहे. याशिवाय, मुंबईसह इतर भागांतून कोकणात येण्यासाठी सोमवारपासून गट आरक्षण सेवेलाही प्रारंभ झाला आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात येत असतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य महामंडळाकडून मुंबई, ठाणे व पालघर परिसरातून कोकणात येण्यासाठी ५ हजार २२० बसेसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान या बसेस कोकणात दाखल होणार आहेत.

१० दिवस मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केल्यानंतर चाकरमान्यांना पुन्हा परतीचे वेध लागतात. हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रत्नागिरी विभागाने स्वतःच्या २,५०० बसेस सज्ज ठेवल्या आहेत. प्रवाशांना एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (Website), एमएसआरटीसी (MSRTC) बस आरक्षण मोबाईल ॲपवरून अथवा थेट सर्व बसस्थानकांवर जाऊन ऑनलाईन व ऑफलाईन आरक्षण करता येणार आहे. तसेच किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी स्वतंत्र ‘गट आरक्षण’ (Group Booking) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवातही प्रवाशांना सवलतींचा लाभ मिळणार आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के भाडे सवलत तर ‘अमृत ज्येष्ठ नागरिकांना’ (७५ वर्षांवरील) १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत लागू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चाकरमान्यांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन आणि गट आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 10-08-2026