Khed News: खेड तालुक्यात आज ‘सेवा संकल्प अभियान’; विमुक्त व भटक्या जाती-जमातींसाठी ११ मंडळांत विशेष शिबिरांचे आयोजन

Khed News: खेड तालुक्यात आज 'सेवा संकल्प अभियान'; विमुक्त व भटक्या जाती-जमातींसाठी ११ मंडळांत विशेष शिबिरांचे आयोजन

विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली; गरजू नागरिकांनी उपस्थित राहण्याचे प्रांताधिकारी वैशाली पाटील यांचे आवाहन

खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावर २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार खेड तालुक्यातील ११ महसूल मंडलांमध्ये विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्व शिबारे २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विविध ठिकाणी एकाचवेळी पार पडणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.

एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा

या विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले, जातीचे दाखले, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नवीन ओळखपत्र नोंदणी व दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका वाटप व दुरुस्ती, सातबारा व महसूलविषयक सेवांचा समावेश आहे.

Infigo Eyecare

तालुक्यातील ११ मंडळांमधील शिबिर ठिकाणे आणि समन्वयक

तालुक्यातील ११ महसूल मंडळांत होणाऱ्या शिबिरांची ठिकाणे आणि तेथे नियुक्त समन्वयक पुढीलप्रमाणे आहेत:

खेड शहर: एल. पी. इंग्लिश स्कूल (प्राथमिक विभाग) – सौरभ बुटाला

चिंचघर मंडल: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तुरी – नंदिनी खांबे व दुर्वास बेंडखळे

भरणे मंडल: ग्रामपंचायत कार्यालय सभागृह – अरुण काकडे, अमितकुमार उपाणेकर व समृद्धी वनारकर

तळे व आंबवली मंडल: राधाकृष्ण हॉल, सुकवली – समीर साबळे, दिनेश शिर्के व रूपेश चोचे

लवेल व धामणदिवी मंडल: ग्रामपंचायत कार्यालय, घाणेखुंट – अमर शेलार व तुषार दिवेकर

भोस्ते मंडल: भोस्ते ग्रामपंचायत कार्यालय – सुमित पेटकर

धामणंद मंडल: ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, धामणंद – किरण तायडे व विक्रम सणघर

कुळवंडी मंडल: छत्रपती शिवाजी हायस्कूल, कुळवंडी – संतोष कालप व समीर सकपाळ

शिर्शी मंडल: ग्रामपंचायत कार्यालय, सवणस खुर्द – त्रिशा धुलप, ओंकार भोसले, मंदार आपटे, संदेश साळूंके व कपिल तांबे

तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रशासनाचे नियोजन

या शिबिरांचे नियोजन आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रचार करण्याची जबाबदारी सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि पोलिस पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नेमून दिलेल्या सर्व महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आवश्यक संगणकीय साहित्यासह वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निर्देश तहसीलदार सुधार सोनवणे यांनी दिले आहेत. गरजू नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.