बंदी असतानाही गाडी नेल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप
Ratnagiri Beach News: रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाच्या भरात गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. प्रशासनाकडून स्पष्ट बंदी असतानाही समुद्राच्या वाळूत नेलेली गाडी भरतीच्या पाण्यात रुतल्याने पर्यटकांची मोठी धांदल उडाली. अखेर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर थेट आपली चारचाकी गाडी घेऊन गेले होते. किनाऱ्यावरील मोकळ्या वाळूत स्टंटबाजी सुरू असतानाच अचानक समुद्राला भरती आली आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाडी किनाऱ्यावरील मऊ वाळूत खोलवर रुतली.
गाडी वाळूत रुतल्याचे लक्षात येताच पर्यटकांनी ती बाहेर काढण्यासाठी स्वतःहून आटोकाट प्रयत्न केले, मात्र जितका प्रयत्न केला तितकी गाडी अधिकच वाळूत खचत गेली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून अखेर स्थानिक ग्रामस्थांना मध्यस्थी करावी लागली. ग्रामस्थांच्या सल्ल्यानुसार तातडीने जेसीबी यंत्र मागवण्यात आले. तब्बल चार तास चाललेल्या थरार आणि अथक प्रयत्नांनंतर जेसीबीच्या मदतीने गाडी सुखरूप बाहेर काढण्यात आली. गाडी बाहेर निघताच पर्यटकांनी तिथून तत्काळ काढता पाय घेतला.
दापोलीपाठोपाठ आता रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांकडून अशा प्रकारे गाड्या नेऊन स्टंटबाजी करण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या बेजबाबदार कृत्यांमुळे किनाऱ्यांची सुरक्षा आणि नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने अशा नियमांची पायमल्ली करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 10-08-2026














