Ratnagiri Fishing News: मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्रीगणेशा गोड! पोषक वातावरणामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण; पहिल्याच टप्प्यात बांगडा, कोळंबी आणि सुरमई जाळ्यात

राज्याच्या हद्दीतील बंदीमुळे केवळ २ टक्के नौका समुद्रात

Ratnagiri Fishing News: दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा रत्नागिरीतील मच्छीमारांसाठी समाधानकारक ठरला आहे. हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगड्यापासून ते मोठ्या आकाराचा बांगडा, कोळंबी आणि सुरमई हे मासे मिळू लागल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पावसाने काहीशी उसंत घेतल्याने समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही नौकांनी तात्काळ अरबी समुद्रात कूच केले. ट्रॉलर्स आणि गिलनेटने मासेमारी करणाऱ्या नौकांना पहिल्याच टप्प्यात उत्तम यश मिळाले आहे. सध्या जाळ्यात सापडणाऱ्या माशांमध्ये सर्वाधिक प्रमाण बांगड्याचे असून एका नौकेला सरासरी ५० ते १०० डिश (एक डिश म्हणजे ३२ किलो) मासे मिळत आहेत.

मात्र, दुसरीकडे राज्य शासनाने १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत (१२ नॉटिकल मैल) मासेमारीवर बंदी कायम ठेवली आहे. केवळ केंद्र शासनाच्या हद्दीत (१२ नॉटिकल मैलांनंतर) मासेमारी करण्यास मुभा आहे. तसेच पावसाने विश्रांती घेतली असली तरी समुद्रातील लाटा आणि वातावरण अद्यापही काही प्रमाणात खवळलेलेच आहे. दूर समुद्रात जाऊन संघर्ष करत मासेमारी करावी लागत असल्याने सध्या जिल्ह्यातील केवळ दोन टक्केच (हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या) नौका समुद्रात उतरल्या आहेत.

१५ ऑगस्टनंतर राज्य शासनाची बंदी उठल्यानंतर आणि वातावरण अधिक शांत झाल्यानंतर सर्वच नौका पूर्ण क्षमतेने समुद्रात उतरतील. पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या या चांगल्या उत्पादनामुळे यंदाचा मासेमारी हंगाम समृद्ध राहील, अशी आशा मच्छीमार व्यक्त करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 10-08-2026