Ambet Bridge: आंबेत पुलावरून अद्याप अवजड वाहतूक बंदच; प्रवासी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संताप

रोबोटिक स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होऊनही निर्णय प्रलंबित; प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Mandangad Traffic News: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण म्हाप्रळ-आंबेत पुलाला बार्जची धडक बसून महिना उलटून गेला तरीही पुलावरील अवजड वाहतूक अद्याप बंदच आहे. पुलाचे रोबोटिक स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असतानाही प्रशासनाकडून अवजड वाहतूक पूर्ववत का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल स्थानिक प्रवासी, व्यापारी आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

६ जुलै रोजी बार्जची धडक बसल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक प्रशासनाकडून तात्काळ रोखण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी हलक्या वाहनांसाठी पूल खुला करण्यात आला; मात्र अवजड वाहनांना अद्यापही या पुलावरून प्रवेश नाकारण्यात आला आहे. पुलाची सद्यस्थिती काय आहे आणि अवजड वाहतूक कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अवजड वाहतूक बंद असल्याचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला आहे. दापोली आणि मंडणगड तालुक्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक एसटी बस फेऱ्या खेडमार्गे, तर काही फेऱ्या मंडणगड-म्हाप्रळ-चिंबावे-महाडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच मंडणगडहून मुंबई व पुण्याकडे जाणारी वाहतूकही म्हाप्रळ-महाडमार्गे सुरू आहे. या लांबच्या पर्यायी मार्गांमुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ कमालीचा वाढला असून प्रवाशांना नाहक अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे, मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनाही वळशाने प्रवास करावा लागत असल्याने इंधनाचा खर्च वाढून वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. म्हाप्रळ-आंबेत पूल हा दापोली, मंडणगड, माणगाव, गोरेगाव आणि म्हसळा या पाच तालुक्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे ऑडिटचा अहवाल समोर ठेवून प्रशासनाने अवजड वाहतुकीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 10-08-2026