Chiplun Crime: पिंपळी बुद्रूक येथे घरफोडी; कपाटाचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २० हजारांची रोकड पळवली; अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद

Chiplun Crime News: चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रूक (गजमळ) येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख ३७ हजार २३२ रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या कालावधीत घडली.

याबाबत विलास रघुनाथ गजमळ (वय ६१, रा. पिंपळी बुद्रुक, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळी बुद्रुक येथील गजमळ वस्तीत राहणारे विलास गजमळ हे आपले घर बंद करून बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्याने मुख्य दरवाजाचे कडी-कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी कपाटाचे कुलूप उचकटून आत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या चोरीत ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे ४२.१६५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे ७४.८०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घरफोडीच्या घटनेमुळे पिंपळी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे व खळबळाट उडालेले वातावरण आहे.

Shanti real estate 1

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 10-08-2026