कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही दगड निखळत असल्याचा दुर्गप्रेमींचा दावा; पुरातत्त्व विभागाच्या चौकशीची मागणी
Khed Fort News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा थेट आरोप ‘महाराजा प्रतिष्ठान’चे सचिव तथा दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केला आहे.
रसाळगड हा कोकणातील ऐतिहासिक वारसा लाभलेला अत्यंत महत्त्वाचा किल्ला असून, त्याच्या जतन व संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अनेक ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निखळून खाली पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा मापुस्कर यांनी केला आहे.
किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी चुना, गूळ, उडीद डाळ आणि पाणी यांसारख्या पारंपरिक मिश्रणाचा वापर केला जात असल्याचे कागदोपत्री सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी या साहित्याचा योग्य वापर आणि अपेक्षित गुणवत्ता अजिबात दिसून येत नाही, असा आरोप दुर्गप्रेमींकडून केला जात आहे. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी तर केवळ मातीचा भराव टाकून काम उरकून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे मापुस्कर यांनी निदर्शनास आणून दिले.
ऐतिहासिक गडांचे संवर्धन करताना दर्जेदार साहित्य, पारंपरिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही हे संवर्धन काम टिकाऊ ठरणार नाही, अशी भीती सर्वच दुर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
रसाळगडाच्या संवर्धनासाठी खर्च होणाऱ्या कोट्यवधींच्या निधीचा योग्य वापर होतोय का आणि कामाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याची पुरातत्त्व विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सखोल तपासणी करावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांवर संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता पुरातत्त्व विभाग यावर काय स्पष्टीकरण देतो आणि काय कार्यवाही करतो, याकडे इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 10-08-2026














