आडे फाटा येथे भटक्या गुरांना अमली पदार्थ देण्याचा प्रकार; गुन्हा दाखल
Dapoli Crime News: दापोली तालुक्यातील आडे फाटा येथे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायी, बैल व पाडी यांना गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांची चोरी करण्याचा अत्यंत धक्कादायक व अयशस्वी प्रयत्न जागरूक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नूरमोहम्मद इसाक कच्छी आणि अमन मुर्तुझा घारे यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रमोद अशोक भागणे (वय २९, रा. आंजर्ले-बिरवाडी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (७ ऑगस्ट) रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास प्रमोद भागणे आणि त्यांचे चुलत भाऊ सुधीर भागणे हे आडे फाटा येथून जात असताना त्यांना दोन संशयित चारचाकी वाहने वारंवार ये-जा करताना दिसली. अधिक बारकाईने पाहिले असता, त्या वाहनांमधील व्यक्ती रस्त्यावरील भटक्या जनावरांना काहीतरी खाद्यपदार्थ खाऊ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संशय आल्याने भागणे यांनी वाहनांवर बॅटरीचा (टॉर्च) प्रकाश टाकताच, वाहनातील इसमांनी तत्काळ गाड्या थेट दापोलीच्या दिशेने पळवून नेल्या. काही वेळानंतर घटनास्थळी आलेल्या स्थानिक तरुणांना रस्त्यावरील काही गायी व पाडी अमली पदार्थाच्या प्रभावामुळे गुंगी आल्यासारख्या अस्ताव्यस्त बसलेल्या व झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
नागरिकांनी प्रसंगावधान राखत या संशयित वाहनांचे नोंदणी क्रमांक तातडीने दापोली पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे हलवून शोधमोहीम राबवली असता, दोन्ही संशयित वाहने दापोली शहरातील ‘नशेमन कॉलनी’ परिसरात उभी असल्याचे निष्पन्न झाले. या जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे जनावरांची तस्करांकडून होणारी मोठी चोरी टळली असून, पोलीस आता या टोळीचा सखोल तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 10-08-2026














