Devrukh Crime : करंबेळे येथील तरुणाची आत्महत्या

सर्व्हिसिंग रॅम्पच्या शेडमध्ये घेतला गळफास

Deorukh Crime News: संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील अवघ्या २७ वर्षीय व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या सर्व्हिसिंग रॅम्पच्या शेडमध्ये लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून प्रदीपने शुक्रवारी आपली जीवनयात्रा संपवली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पवार हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ७:४५ वाजता आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी (सर्व्हिसिंग रॅम्प) गेला होता. दररोज रात्री ८ वाजेपर्यंत काम आटोपून तो घरी परतत असे. मात्र, शुक्रवारी रात्री उशीर झाला तरी तो घरी न आल्यामुळे त्याचा भाऊ प्रशांत पवार याने त्याला फोन केला. वारंवार फोन करूनही प्रदीप फोन उचलत नसल्याने प्रशांतला शंका आली.

त्यानंतर प्रशांत पवार याने रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास सर्व्हिसिंग रॅम्प गाठले. तेथे शेडचे शटर बंद होते आणि बाहेर प्रदीपची मोटारसायकल उभी होती. शटर उघडून आत पाहिले असता, प्रदीप छताच्या लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रशांतने तातडीने त्याला खाली उतरवले; मात्र दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

मयत प्रदीप हा अत्यंत शांत, कष्टाळू आणि गावात प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा तरुण म्हणून परिचित होता. त्याचा मोठा मित्रपरिवार असून, त्याच्या अशा अचानक जाण्याने करंबेळे गाव आणि संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 10-08-2026