ट्रिबल कार डिव्हायडर ओलांडून वॅगनारला धडकली
Khed Accident News: मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे (ता. खेड) येथील सीएनजी पंपासमोर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (९ ऑगस्ट) दुपारी सुमारे ३:२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असलेल्या ट्रिबल कार (क्रमांक MH 08 AX 6496) वरील चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगातील कार प्रथम महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन जोरात धडकली. त्यानंतर ती अनियंत्रित होऊन विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये शिरली आणि चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनार कारला (क्रमांक MH 43 CK 8840) तिने जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे चार जण गंभीर जखमी झाले. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्मेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली ‘जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान’ची २४ तास आपत्कालीन सेवा देणारी रुग्णवाहिका क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या चालकाने आणि मदतनीसांनी तातडीने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या सर्व जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. महामार्गावर घडलेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 10-08-2026














