२०२० पासून रुग्णालयात गोळ्यांचा साठा नसतानाही सापडल्या गोळ्या; अवैध गर्भपाताचा संशय बळावला
Chiplun News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) ३ जून रोजी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८, रा. पागमळा, चिपळूण) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. लाचखोरीच्या कारवाईनंतर आता डॉ. मदार यांच्यावर गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार (MTP Act) अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० पासून वैद्यकीय गर्भपाताच्या (MTP) गोळ्यांचा कोणताही साठा उपलब्ध नव्हता आणि रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयाकडे अशी मागणीही केली नव्हती, ही धक्कादायक बाब समोर आली होती. त्यामुळे डॉ. मदार यांच्याकडे सापडलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांवरून अवैध गर्भपाताचा संशय व्यक्त केला जात होता.
कामथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. कांचन मदार यांना एका तक्रारदाराकडून गर्भपाताच्या किटसाठी ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ३ जून रोजी सायंकाळी ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या धडक कारवाईने संपूर्ण आरोग्य आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
डॉ. मदार यांच्या अटकेनंतर जिल्हा आरोग्य विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान २०२० पासून रुग्णालयात शासकीय गोळ्या नसताना डॉ. मदार यांच्याकडे या गोळ्या आल्या कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी पत्रव्यवहार करून जप्त केलेल्या गोळ्यांची तांत्रिक माहिती मागवली.
लाचलुचपत विभागाने जप्त केलेल्या गोळ्यांची माहिती दिल्यानंतर, त्या गोळ्या गर्भपातासाठीच वापरल्या जाणाऱ्या असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या अहवालात स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारे आता लाचलुचपत विभागाने डॉ. कांचन मदार यांच्याविरुद्ध गर्भपात प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई तीव्र केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 10-08-2026














