नगर परिषदेच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह
Rajapur News: राजापूर शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. राजापूर शहरात शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक संतोष कोळवणकर यांच्यावर मोकाट गुराने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कोळवणकर हे जखमी झाले आहेत.
ही घटना शहरातील गणेश घाट परिसरात घडली. गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांचा वावर असतो. याच ठिकाणी सकाळी फिरत असताना एका मोकाट बैलाने अचानक कोळवणकर यांच्यावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, अवघ्या पाच-सहा दिवसांपूर्वीच राजापूर नगर परिषद प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम राबवून १३ मोकाट जनावरांना पकडून चिपळूण येथील गोशाळेत रवाना केले होते. या धडक कारवाईमुळे शहराला मोकाट जनावरांच्या त्रासातून दिलासा मिळेल अशी आशा नागरिकांना होती. मात्र, शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे पालिका प्रशासनाची मोहीम तोकडी पडल्याचे आणि शहरात अजूनही मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरे फिरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
सध्या गणेश घाट, शिवाजी पथ, आठवडा बाजार परिसर आणि शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरे मुक्तपणे वावरत आहेत. यामुळे पादचारी, सकाळी फिरणारे नागरिक, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता सातत्याने राबवावी आणि उर्वरित सर्व मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 10-08-2026














