सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी FDA सतर्क; जंक फूडवरही होणार कारवाई
Ratnagiri Food Safety News: रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत राबवलेल्या या धडक कारवाईत ८ ठिकाणी छापे मारून सुमारे ६ लाख १४ हजार ४७० रुपयांचा संशयित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी एफडीएचे पथक पूर्णपणे सतर्क झाले आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, डेअरी तसेच विविध खाद्यपदार्थ उत्पादक अशा एकूण १५१ आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळलेल्या ३२ आस्थापनांना प्रशासनाकडून सुधारणा नोटिसा (Improvement Notices) बजावण्यात आल्या आहेत.
तसेच, एफडीएच्या पथकाने जिल्ह्यातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि उत्पादकांकडून एकूण ८९ अन्नपदार्थांचे नमुने (Food Samples) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यापैकी आतापर्यंत ३२ नमुन्यांचे अधिकृत अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, बाजारात भेसळयुक्त पनीरची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पनीर तपासणी मोहीमही राबवण्यात आली.
दरम्यान, अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नवीन आदेशानुसार, आता शाळा आणि महाविद्यालयीन परिसराच्या ५० मीटरच्या आत मिळणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या ‘जंक फूड’ (Junk Food) विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 10-08-2026














