करक धरण पूर्ण क्षमतेने भरले; सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू
Rajapur News: राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वपूर्ण अर्जुना प्रकल्पाची (करक धरण) आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग तसेच परिसरातील परिस्थितीची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली आणि पाटबंधारे विभागाला आवश्यक सूचना दिल्या.
सततच्या मुसळधार पावसामुळे अर्जुना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश आमदार सामंत यांनी दिले.
धरण परिसरावर सातत्याने लक्ष ठेवून पाण्याच्या पातळीचे नियमित निरीक्षण करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या. पाहणीदरम्यान धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणांची तयारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, नदीकाठच्या व आसपासच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 10-08-2026














