Sangameshwar Agitation: तक्रारींचा निपटारा न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा; देवरुख पंचायत समितीच्या कारभारावर संताप

पंचायत समितीच्या दिरंगाईमुळे संगमेश्वर तालुक्यात ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष


Sangameshwar Agitation News: संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थांनी सादर केलेले तक्रारी अर्ज, चौकशी अर्ज आणि निवेदने गेल्या वर्षभरापासून देवरुख पंचायत समितीच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. या अर्जांवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. १५ ऑगस्टपर्यंत तक्रारींचा तातडीने निपटारा न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तालुक्यातील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी (BDO), विस्तार अधिकारी आणि संबंधित विभागांकडे रस्ते, पाणीपुरवठा, घरकूल योजना, मनरेगा (नरेगा), शौचालय यांसारख्या मूलभूत व महत्त्वाच्या समस्यांबाबत लेखी तक्रारी व चौकशी अर्ज सादर केले होते. मात्र, हे अर्ज देऊन वर्षभराचा कालावधी उलटला तरी प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतलेली नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

देवरुख पंचायत समितीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे तालुक्याचा विकास पूर्णपणे खुंटला असल्याचा संताप व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांना वारंवार कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायला लावल्या जात आहेत. अधिकाऱ्यांच्या या उदासीन आणि निष्काळजी वृत्तीमुळे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना केवळ कागदावरच राहिल्याची संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिकांमधून उमटत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 10-08-2026