बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्त वाढवण्याची माजी आमदार संजय कदम यांची मागणी
Khed Crime News: खेड येथील मध्यवर्ती बसस्थानकातील रसवंतीगृहात उघडपणे मद्यपान करणाऱ्या दोन व्यक्तींना माजी आमदार संजय कदम यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड बसस्थानक परिसरातील एका रसवंतीगृहात दोन व्यक्ती मद्यपान करत असल्याचे माजी आमदार संजय कदम यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या दोघांना तिथेच पकडून खेड पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर संजय कदम यांनी थेट खेड पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांची भेट घेतली आणि बसस्थानक परिसरात घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक आणि गजबजलेल्या ठिकाणी असा प्रकार घडत असल्याने बसस्थानकातील ते रसवंतीगृह तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच मद्यपान करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी आग्रही मागणी कदम यांनी पोलिसांकडे केली. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
खेड बसस्थानक हे रोज हजारो प्रवाशांची मोठी वर्दळ असलेले सार्वजनिक ठिकाण आहे. अशा ठिकाणी मध्यधुंद व्यक्तींमुळे महिला व इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस आणि कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. याप्रकरणी आता खेड पोलीस कायदेशीर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 10-08-2026














