दिल्लीतील हायप्रोफाईल रिसेप्शनमध्ये मोदींसोबत दिसलेला कोकणातील तरुण कोण? शरद पवारांनी करून दिली ‘फणस किंग’ मिथिलेश देसाईंची ओळख

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या लग्नसोहळ्यात पंतप्रधान मोदी अन् मिथिलेश देसाई यांच्यात पार पडली विशेष भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांच्या लग्नाचे भव्य रिसेप्शन नुकतेच नवी दिल्लीत पार पडले. या हायप्रोफाईल कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमातील एक विशेष प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी उभा राहून एक तरुण मोबाईलमध्ये त्यांना काहीतरी दाखवताना दिसला. हा तरुण दुसरा कोणी नसून रत्नागिरीचा ‘फणस किंग’ मिथिलेश देसाई आहे.

शरद पवारांनी घालून दिली पंतप्रधान मोदींशी भेट

शरद पवार यांनी नातीच्या विवाहाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी मिथिलेश देसाई याला विशेष निमंत्रित केले होते. एवढेच नाही तर शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मिथिलेशची गाठभेट घालून दिली. या वेळी त्यांनी मिथिलेशच्या फणस प्रक्रिया उद्योगाबद्दल आणि त्याच्या नाविन्यपूर्ण कामाबद्दल पंतप्रधान मोदींना थोडक्यात माहिती दिली. या प्रसंगी मिथिलेशने आपल्या कामाचे सादरीकरण मोबाईलद्वारे पंतप्रधानांसमोर केले.

मिथिलेश देसाई कोण आहे?

  • लांजाचा ‘फणस किंग’: मिथिलेश देसाई हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील रहिवासी असून तो ‘फणस किंग’ (Jackfruit King) म्हणून प्रसिद्ध आहे.
  • जॅक फ्रुट ऑफ इंडिया: मिथिलेशच्या ‘जॅक फ्रुट ऑफ इंडिया’ (Jackfruit of India) या कंपनीने लंडनस्थित ‘सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब’ या सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टमला चालना देणाऱ्या संस्थेसोबत ३ वर्षांपूर्वी महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) केला होता.
  • आंतरराष्ट्रीय ब्रँड अँम्बेसेडर: भारतासाठी लंडनस्थित ‘सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब’च्या ब्रँड अँम्बेसेडर पदाची जबाबदारी सध्या मिथिलेश देसाई यांच्याकडे आहे.

कोकणातील १,००० हून अधिक शेतकऱ्यांना फायदा

मिथिलेशच्या या उपक्रमाचा आणि आंतरराष्ट्रीय कराराचा फायदा रत्नागिरी व सिंधुदुर्गातील १,००० हून अधिक शेतकऱ्यांना झाला आहे:

  • टाकाऊतून टिकाऊ उत्पादने: कोकणातील आंब्याचा बाठा, साली, काजू बोंड यांसारख्या टाकाऊ किंवा वाया जाणाऱ्या वस्तूंपासून आर्थिक उत्पन्न देणारी उत्पादने बनवली जात आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे बाजारमूल्य आहे.
  • पर्यावरण संवर्धन: आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी लंडनची ही कंपनी जागतिक पर्यावरण संतुलनासाठी आणि ‘कार्बन क्रेडिट’ (Carbon Credit) क्षेत्रामध्ये मोठे काम करत आहे.