पेठमाप परिसरात विनापरवाना व अटींचे उल्लंघन करत अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर चालकांवर गुन्हे नोंद
चिपळूण:
Mumbai Goa Highway News बाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर अवजड व आकारामानापेक्षा मोठ्या मालाची (ओव्हर डायमेन्शनल कन्साईनमेंट) वाहतूक करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या अटी व शर्तींचे उघडपणे उल्लंघन केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी दोन ट्रेलर चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ९ ऑगस्ट रोजी दुपारी आणि सायंकाळी पेठमाप परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.
पहिली घटना दुपारी २.१० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (ई) वरील पेठमाप येथे घडली. या प्रकरणी कुलदीप धुरेंद्र सिंह (वय २७, रा. रायपूर, छत्तीसगड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप सिंह याने ट्रेलर क्रमांक (टीजी-०७-डीडी-६८४३) मधून अवजड मालाची वाहतूक केली होती. या वाहतुकीसाठी मुंबई येथून प्राप्त केलेल्या ‘Permission to Carry Over Dimensional Consignment’ आदेशातील अटींचे उल्लंघन केल्याचा आणि सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
Mumbai Goa Highway News: सायंकाळी दुसरी कारवाई; परप्रांतीय चालकावर गुन्हा नोंद
दुसरी घटना त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास याच मार्गावर घडली. या प्रकरणी दयानंद रामदास विश्वकर्मा (वय ३८, रा. शांत गोपाळी भटवली बाजार, ता. खडुणी, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरोधातही कलम २२३ व भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
विश्वकर्मा याने ट्रेलर क्रमांक (एमएच-४३-एचएच-८०५७) मधून अशोक लेलँड कंपनीचा १४ टायरी ट्रेलर चालवताना संबंधित परवानगीतील अटींचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. बेदरकारपणे वाहन चालवून सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका अथवा दुखापत होण्याची शक्यता निर्माण केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक व पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 11-08-2026














