Nivendi Mango Cashew Park: गुंठ्याला २८,५८८ रुपये दर निश्चित; एमआयडीसीकडून महसूल प्रशासनाकडे निधी वर्ग
रत्नागिरी:
Nivendi Mango Cashew Park च्या उभारणीच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी (MIDC) भूसंपादनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी व तळेकरवाडी परिसरातील जमीनमालकांना मोबदला देण्यासाठी एमआयडीसीकडून महसूल प्रशासनाला तब्बल १२० कोटी रुपये प्राप्त झाले असून, येत्या काही दिवसांत ४४६ खातेदारांना प्रत्यक्ष मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
भूसंपादनासाठी नगररचनाकारांकडून प्राप्त दराच्या आधारे प्रति गुंठा २८ हजार ५८८ रुपये (याच आधारे प्रति हेक्टर २८ लाख ५८ हजार ८०० रुपये) दर निश्चित करण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही काळापासून भूसंपादनाच्या मोबदल्याची वाट पाहणाऱ्या स्थानिक जमीनमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Nivendi Mango Cashew Park: तब्बल ९८.७९ हेक्टर जमिनीवर उभारणार पार्क
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी निवेंडी परिसरात मँगो-कॅश्यू पार्क उभारण्याच्या दृष्टीने सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर प्रशासनाकडून जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.
या प्रकल्पामध्ये निवेंडी येथील ९१.२३ हेक्टर आणि तळेकरवाडी येथील ७.५६ हेक्टर, अशी एकूण ९८.७९ हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे.
स्थानिकांच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण
भूसंपादन प्रक्रियेदरम्यान स्थानिक जमीनमालकांकडून एक ५२ नव्हे तर ४५ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व हरकतींवर प्रशासनाकडून कायदेशीर सुनावणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतरच अंतिम मोबदला दर निश्चित करून प्रक्रियेला गती देण्यात आली. निवेंडी आणि तळेकरवाडी परिसरात एकूण ९९ सातबारा उतारे असून, त्यामध्ये निवेंडीतील ४०३ आणि तळेकरवाडीतील ४३, असे एकूण ४४६ खातेदार आहेत.
रोजगारनिर्मितीला गती; प्रांताधिकारी जीवन देसाईंचा विशेष पुढाकार
एमआयडीसीकडून प्राप्त झालेल्या १२० कोटी रुपयांच्या निधीच्या आधारे आता उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयामार्फत खातेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली जात आहे. ही प्रक्रिया संपताच थेट बँक खात्यात किंवा चेकद्वारे मोबदला वाटप सुरू होईल. या महत्त्वपूर्ण भूसंपादन प्रक्रियेत प्रांताधिकारी जीवन देसाई आणि महसूल टीमने विशेष मेहनत घेतली आहे.
निवेंडी येथे उभारण्यात येणाऱ्या मँगो-कॅश्यू पार्कमुळे कोकणातील मुख्य पिके असलेल्या आंबा (हापूस) आणि काजूवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योगांची साखळी तयार होऊन शेकडो तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 11-08-2026













