Guhagar Chiplun Highway: गुहागर-चिपळूण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरही पडल्या मोठ्या भेगा

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

रामपूर:

Guhagar Chiplun Highway News बाबत समोर आलेल्या वास्तववादी चित्रानुसार, गुहागर-विजापूर महामार्गावरील चिपळूण ते गुहागर मार्गावर अनेक ठिकाणी सुमारे अर्धा फूट खोल खड्डे पडले आहेत. इतकेच नव्हे तर नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरही ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनी ‘मनिषा कन्स्ट्रक्शन’ आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून हा मार्ग प्रवाशांसाठी सुखकर करावा, अशी आक्रमक मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

या मार्गावरील सिमेंट काँक्रीटच्या कामात अनेक ठिकाणी सिमेंटचा वापर कमी केल्यामुळे रस्त्यावरील खडी वर आली आहे. सिमेंट कमी पडलेल्या ठिकाणी रस्ता प्रचंड खडबडीत झाला असून वाहनांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील मार्गताम्हाणे, रामपूर, गुढे फाटा, रामपूर तळ्याजवळ, रामपूर घाटी, तांबी, निव्हाळ, मालघर, गणेश खिंड, पाचाड, रिगल कॉलेज कोेंढे आणि मिरजोळी या भागात अत्यंत मोठे खड्डे पडले असून हा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे.

Guhagar Chiplun Highway News: वाहतुकीचा वेग अन् गतीरोधकांची मागणी

उक्ताड रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून रामपूर गुढे फाटा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मिलिंद हायस्कूल रामपूर प्रशालेसमोर वाहने अत्यंत वेगाने धावतात. या मार्गावरून ट्रक, कन्टेनर, गॅस सी.एन.जी. कन्टेनर, एसटी बस, टेम्पो, रिक्षा व चारचाकी वाहने वेगाने जात असताना गुरे, माणसे व श्‍वानांचे अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, मनिषा कन्स्ट्रक्शन, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडे गुढे फाटा, प्राथमिक आरोग्य केंद्र व मिलिंद हायस्कूल रामपूर प्रशालेसमोर मोठे गतीरोधक बसवण्याची मागणी केली आहे. यावर सा. बां. विभागाच्या अभियंत्यांनी हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. रामपूर ग्रामपंचायतीनेही गतीरोधकाचा प्रस्ताव पाठवला असून, लोकप्रतिनिधी व ठेकेदार कंपनीने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 11-08-2026