गोवळकोट रोड परिसरातील व्यावसायिकांवर नगर परिषदेची धडक कारवाई
Chiplun Plastic Ban: चिपळूण नगर परिषदेने एकल वापर प्लास्टिक (Single-Use Plastic) बंदी मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करत १७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध आस्थापनांकडून एकूण २१ हजार रुपयांचा दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला. नगर परिषदेच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, चिपळूण नगर परिषद हद्दीत एकल वापर प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन झाडाझडती घेण्यात आली.
या तपासणी मोहिमेत गोवळकोट रोड परिसरातील हॉटेल व्यवसायिक, बेकरी व्यवसायिक, मटण व मच्छी विक्रेते, तसेच भाजी व फळे विक्री करणाऱ्या आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. या वेळी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करत तब्बल १७ किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला.
सदर धडक कारवाई चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव आणि उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आली. या कारवाईत आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजीत जाधव, आरोग्य निरीक्षक प्रविण जाधव, अतिक्रमण विभागाचे संदेश टोपरे, मुकादम दीपक किंजळकर, कार्यालयीन कर्मचारी मनीष जाधव आणि स्वच्छतादूतांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन ही कारवाई यशस्वी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 11-08-2026













