एमआयडीसी रस्त्यावर थांबलेल्या डंपरला मागून धडक; तिन्ही वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
बातमी
रत्नागिरी:
Ratnagiri Kuwarbav Dumper Accident बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीजवळील कुवारबाव परिसरात मंगळवारी सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा विचित्र आणि भीषण अपघात घडला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या एका डंपरला मागून येणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या डंपरने जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक व नागरिक सुरक्षित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथे एक डंपर (MH 08 DD 7794) एमआयडीसी रोडकडे वळण्यासाठी थांबला होता. याच वेळी अमीन रेड्डी हे चालवत असलेला दुसरा डंपर (MH 08 AP 2637) मागून येत होता. अचानक डंपरचे ब्रेक न लागल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा डंपर थेट पुढे थांबलेल्या डंपरवर जाऊन आदळला.
Ratnagiri Kuwarbav Dumper Accident: धडकेनंतर डंपर रिव्हर्स आला अन् तिसऱ्या डंपरला ठोकले
पहिल्या डंपरला धडक दिल्यानंतर अमीन रेड्डी यांचा डंपर अनियंत्रित होऊन मागे (रिव्हर्स) आला. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरला (MH 08 W 2900) देखील या डंपरची जोरदार धडक बसली. एकापाठोपाठ झालेल्या या विचित्र अपघातात तिन्ही डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.
स्थानिक परिसरात काही काळ वाहतूक कोंडी
अपघाताची तीव्रता पाहाता मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात होती; मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अपघाताच्या घटनेनंतर कुवारबाव परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत वाहतूक पूर्ववत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 11-08-2026














