Instagram Reel Competition: ‘माझी शेती, माझा अभिमान’ स्पर्धेत मिथिल दळवींच्या ‘हातभार’ रीलला प्रथम क्रमांक; उदय सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Instagram Reel Competition द्वारे कोकणातील तरुणाईने मांडली शेतीची गोष्ट; ओंकार ऍग्रोटेकच्या उपक्रमाला रत्नागिरी, रायगड अन् सिंधुदुर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी:

शेती आणि शेतकऱ्यांविषयीचा अभिमान सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘ओंकार ऍग्रोटेक’च्या वतीने ‘माझी शेती, माझा अभिमान’ या विशेष इंस्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मिथिल दळवी यांच्या ‘हातभार’ या रीलने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. उद्योगमंत्री ना. श्री. उदय सामंत यांच्या शुभहस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी उदय सामंत यांनी ओंकार ऍग्रोटेकच्या या अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रमाची प्रशंसा करत स्पर्धकांचे मनोबल वाढवले.

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या रील स्पर्धेत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील तरुणांसह विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. स्पर्धकांनी आपल्या शेतीचे प्रत्यक्ष अनुभव, शेतकऱ्यांचे अपार कष्ट, पारंपरिक शेतीपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग रील्सच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केले.

या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले:

  • प्रथम क्रमांक: मिथिल दळवी (‘हातभार’) – ₹२५,००० रोख व सन्मानचिन्ह.
  • द्वितीय क्रमांक: ‘झो मंडळी’ (‘चला शेती व शेतकरी समृद्ध करूया’) – ₹२०,००० रोख व सन्मानचिन्ह.
  • तृतीय क्रमांक: प्रथमेश पवार (‘The Last फोटो’) – ₹१५,००० रोख व सन्मानचिन्ह.

विषयाची मांडणी आणि सर्जनशीलतेच्या निकषांवर निवड

या स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या रील्समध्ये शेतकऱ्यांची आव्हाने, यांत्रिक शेती, शासकीय योजना तसेच शेतीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. काहींनी अभिनय व कथाकथनातून तर काहींनी प्रत्यक्ष शेतातील प्रयोगांतून विषय मांडला. विजेत्यांची निवड करताना विषयाची मांडणी, सर्जनशीलता, अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन, आशय आणि आत्मीयता या निकषांचा विचार करण्यात आला, ज्यामुळे अंतिम निवड करणे परीक्षकांसाठी आव्हानात्मक ठरले.

सोशल मीडिया ही केवळ मनोरंजनाची नसून विचारांची चळवळ: उदय सामंत

बक्षीस वितरणादरम्यान ना. उदय सामंत यांनी सांगतले की, “सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता शेती आणि शेतकऱ्यांचा सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी करणे कौतुकास्पद आहे”. त्यांनी सर्व स्पर्धकांच्या सर्जनशीलतेची प्रशंसा करत भविष्यातही अशा उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले.

आयोजकांनी भूमिका मांडताना सांगितले की, “‘माझी शेती, माझा अभिमान’ ही केवळ रील स्पर्धा नसून शेतीकडे अभिमानाने पाहण्याची आणि शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव समाजापर्यंत पोहोचवण्याची एक चळवळ आहे. सोशल मीडियावरून लाखांपर्यंत पोहोचणाऱ्या या माध्यमातून तरुणाईने शेतीची सकारात्मक बाजू मांडावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे”.

या उपक्रमामुळे कोकणातील तरुणाईला एक प्रभावी व्यासपीठ मिळाले असून, भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस ओंकार ऍग्रोटेकने व्यक्त केला आहे. शेवटी तिन्ही जिल्ह्यांतील स्पर्धक, परीक्षक व समर्थकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 12-08-2026