Ratnagiri Scholarship Result: रत्नागिरी जिल्ह्यातील ६३२ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक; गुणवत्तेची राज्यस्तरावर छाप

८ विद्यार्थ्यांनी मिळवले राज्य गुणवत्ता यादीत स्थान; रत्नागिरी तालुका ठरला आघाडीवर


रत्नागिरी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ६३२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या एकूण शिष्यवृत्तीधारकांमध्ये इयत्ता चौथीतील २९० आणि इयत्ता सातवीतील ३४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत (State Merit List) आपले स्थान पटकावून कोकणातील गुणवत्तेचा झेंडा पुन्हा एकदा राज्यस्तरावर फडकवला आहे.

इयत्ता चौथी व सातवी परीक्षेची आकडेवारी
जाहीर झालेल्या निकालानुसार, इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून ८ हजार ९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ७३९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले. यातून २ हजार ५२५ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यापैकी २९० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

दुसऱ्या बाजूला, इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी ६ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ६ हजार ५०७ विद्यार्थी परीक्षेला बसले. परीक्षेत १ हजार ६४५ विद्यार्थी पात्र ठरले असून, अंतिम निवड यादीत ३४२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यात यश आले आहे.

तालुकानिहाय निकालात रत्नागिरी तालुक्याची बाजी
तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारकांची संख्या पाहता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुका अव्वल स्थानी राहिला आहे. रत्नागिरी तालुक्यातून इयत्ता चौथीचे ८१ तर सातवीचे १०१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या (चौथी व सातवी):

रत्नागिरी: ८१ (चौथी) | १०१ (सातवी)

राजापूर: ३८ (चौथी) | ३८ (सातवी)

संगमेश्वर: ३६ (चौथी) | ४२ (सातवी)

चिपळूण: ३५ (चौथी) | ४६ (सातवी)

खेड: ३२ (चौथी) | ५१ (सातवी)

लांजा: २९ (चौथी) | १३ (सातवी)

दापोली: २२ (चौथी) | २८ (सातवी)

गुहागर: १४ (चौथी) | १६ (सातवी)

मंडणगड: २ (चौथी) | ७ (सातवी)

अभिनव आणि मनस्वी या देसाई भावंडांची चमकदार कामगिरी
या परीक्षेमध्ये प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या दोन्ही मुलांनी उत्तम गुण मिळवत विशेष चमक दाखवली आहे. त्यांचा मुलगा अभिनव देसाई याने सातवीच्या परीक्षेत जिल्ह्यात ५५ वा क्रमांक मिळवला असून तो पटवर्धन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तर मुलगी मनस्वी देसाई हिने चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ८ वा क्रमांक पटकावला असून ती कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरमध्ये शिकत आहे. एकाच घरातील भाऊ-बहिणीने मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 12-08-2026