२० ते २२ कोटींच्या फसवणुकीचा दावा; आरोपींची मालमत्ता जप्त करून पैसे परत करण्याची मागणी
रत्नागिरी: आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे पैसे भरूनही त्याची परतफेड न झाल्याचा गंभीर आरोप करत फसवणूक झालेल्या ग्राहकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल १२०० सदस्यांकडून अंदाजे २० ते २२ कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणातील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे त्वरित परत मिळावेत, आरोपींच्या मालमत्ता जप्त करून रक्कम वसूल करावी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी झालेला खर्च मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ‘ह्युमन राईट्स ऑफ प्रोटेक्शन’चे जिल्हा संघटक तथा ‘युवा सामाजिक संस्था मुचरी’चे अध्यक्ष विलास वामन सुर्वे यांनी दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती दीपराज शिंदे यांनी दिली आहे.
रोजगाराच्या अपेक्षेने कर्ज अन् दागिने गहाण ठेवून भरले पैसे
आरजू टेकसोल कंपनीकडून ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने तयार करण्याचे काम देण्यात आले होते. कंपनीकडून कच्चा माल व मशिनरी उपलब्ध करून दिली जाईल आणि तयार केलेल्या मालाचे पैसे ठरावीक कालावधीत थेट बँक खात्यावर जमा केले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला कंपनीचे काम सुरळीत सुरू असल्याने रोजगाराची संधी निर्माण होईल या आशेने अनेकांनी यात पैसे गुंतवले. काहींनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून तर काहींनी कर्ज काढून कंपनीत रक्कम भरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
१२०० सदस्यांची २० ते २२ कोटींची फसवणूक; ५८७ जणांचा FIR
निवेदनानुसार, एकट्या सुर्वे यांच्या ग्रुपमधील ३८७ सदस्यांनी अंदाजे ८ ते ९ कोटी रुपये भरले आहेत, तर एकूण १२०० सदस्यांकडून २० ते २२ कोटी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. वर्षभर व्यवहार सुरळीत चालल्यानंतर सदस्यसंख्या वाढवण्यात आली; मात्र त्यानंतर तयार मालाचे पैसे मिळणे बंद झाले. कंपनीकडे मार्केटिंग व गुणवत्ता नियंत्रणाची सोय नसल्याने माल परत येऊ लागला आणि व्यवहार विस्कळीत झाले. याप्रकरणी ५८७ जणांनी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केला असून प्रसाद फडके, संजय केळकर आणि सुधीर सावंत यांना अटक करण्यात आली होती, तर मुख्य सूत्रधार अनि ऊर्फ अमन जाधव हा अद्याप फरार आहे. सायली सरफरे यांची पुराव्याअभावी सुटका झाली आहे.
सील केलेल्या मालाचा लिलाव नाही; आरोपींच्या जामिनामुळे कोंडी
गेल्या तीन वर्षांपासून हा न्यायालयीन लढा सुरू असून, गोदामात सील केलेल्या मालाचा लिलाव करून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने अद्याप केलेली नाही, अशी तक्रार बाधितांनी केली आहे. त्यातच अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्याने आणि मुद्दलापेक्षा व्याजाचा बोजा वाढल्याने बाधितांची आर्थिक कोंडी झाली आहे. तीन वर्षे उपोषण, न्यायालयीन लढा, प्रशासकीय पाठपुरावा आणि पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात दाद मागूनही कोणताही तोडगा निघालेला नाही.
१५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
सुर्वे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ ऑगस्टपर्यंत बाधितांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. तोडगा न निघाल्यास १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या इशाऱ्याची प्रत मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री, प्रांताधिकारी आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी जप्त मालाची विल्हेवाट आणि थकीत रकमेबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन कायदेशीर तोडगा काढणे गरजेचे बनले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 12-08-2026














