रत्नागिरी-कोल्हापूर प्रवासाचे अंतर ४२ किमीने वाढले; तिकिट दरातही वाढ होण्याची शक्यता
रत्नागिरी:
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाकडून पुढील आदेशापर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी विभागातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या आता लांजा-वाटूळ-ओणी-पाचल-अनुस्कुरा-मलकापूर-कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून या पर्यायी मार्गावरून एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे रस्त्याला भेगा आणि वाहतुकीचा धोका
आंबा घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. या अतिवृष्टीमुळे घाटातील रस्ता खचून त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच दरड कोसळल्याने अपघाताचा आणि वाहतुकीचा धोका अधिक वाढला आहे. यापूर्वी घाटातून केवळ अवजड वाहतूक बंद करून एसटी बसची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती; मात्र परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आंबा घाट बंद करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर परिवहन विभागानेही सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आंबा घाटाचा रस्ता बंद केला आहे.
प्रवासाचे अंतर ४२ किमीने वाढणार; तिकिट दरात सात टप्प्यांनी वाढ
प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक आश्वजित जानराव यांनी आगारांना अनुस्कुरा-मलकापूर मार्गाचे सुधारित टप्पा पत्रक उपलब्ध करून दिले आहे. या नव्या पर्यायी मार्गामुळे रत्नागिरी-कोल्हापूर एसटी प्रवासाचे अंतर प्रतिफेरी सुमारे ४२ किलोमीटरने वाढणार आहे. परिणामी, फेऱ्यांचे अंतर वाढल्याने प्रवाशांच्या तिकिटाच्या दरात सात टप्प्यांनी वाढ होणार आहे.
“प्रशासनाच्या सूचनेनुसार मंगळवारपासून एसटी बसेस अनुस्कुरा घाटमार्गे धावत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविले आहे. रत्नागिरी-कोल्हापूरचे अंतर वाढल्याने तिकीट दरातही वाढ होणार आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.”
— आश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून परिस्थितीची पाहणी
आंबा घाटातील या गंभीर परिस्थितीची पाहणी यापूर्वीच लांजा-राजापूरचे आमदार किरण भय्या सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि पोलीस अधीक्षकांनी केली होती. घाटातील रस्त्याला पडलेल्या भेगा आणि पावसामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 12-08-2026














