आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांकडून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
खेड:
तालुक्यातील लोटे औद्योगिक परिसरातून महावितरण कंपनीची ३० हजार रुपये किमतीची विजेची केबल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच्या खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दत्तात्रेय शिवाजी गोडसे (वय २५, रा. नरळेवस्ती, खिलारवाडी-सांगोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गजाआड
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने लोटे परिसरातून महावितरणची केबल लंपास करून पळ काढला होता. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २८ मार्च २०२६ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्तहेरांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मुद्देमाल हस्तगत; अन्य गुन्ह्यांचा तपास सुरू
पोलिसांनी आरोपीकडून चोरलेला सर्व ऐवज (केबल) यशस्वीरीत्या हस्तगत केला आहे. या आरोपीचा अशाच प्रकारच्या इतर काही चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 12-08-2026














