पुराव्यांअभावी न्यायालयाने दिला निकाल; अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी
गुहागर:
तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे एसटी बसच्या झालेल्या दुर्देवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यातून एसटी चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ (रा. चिखली, कडमवाडी, गुहागर) यांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीविरोधात पुरेसा व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
२ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली होती घटना
वेलदूर नवानगर येथे २ फेब्रुवारी २०२३ रोजी एसटी बस वळवत असताना एका महिलेचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी एसटी बसचालक चंद्रकांत सकपाळ यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अभियोजन पक्षाकडे पुराव्यांचा अभाव
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपलब्ध संपूर्ण अभिलेख, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तरपणे विचारात घेतले. अभियोजन पक्षाने अनेक साक्षीदार तपासले तरी आरोपी चालक सकपाळ यांच्याविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा आणि विश्वासार्ह पुरावा सादर करण्यात अभियोजन पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
बचाव पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
चालक चंद्रकांत सकपाळ यांच्यातर्फे ॲड. संकेत साळवी यांनी न्यायालयात बाजू मांडत महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे उपस्थित केले. न्यायालयासमोर आलेल्या सर्व बाबींचा आणि पुराव्यांचा सूक्ष्म विचार करून न्यायालयाने आरोपी चालकाची निर्दोष मुक्तता केली. या कायदेशीर लढ्यात ॲड. संकेत साळवी यांना ॲड. अलंकार विखारे, ॲड. सुप्रिया वाघधरे, ॲड. रोशनी पवार आणि ॲड. मानसी सोमण यांनी सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 12-08-2026














