Rajapur River Pollution: राजापुरात नदीपात्रात चिकनची घाण टाकणाऱ्या व्यावसायिकाला रंगेहात पकडले; नगरसेवक व कर्मचाऱ्यांची धडक कारवाई

नगर परिषद प्रशासन आक्रमक; कोंढे तड पुलावर रंगेहात पकडून केली दंडात्मक कारवाई

राजापूर:

राजापूर शहरातील कोंढे तड पुलावरून अर्जुना नदीच्या पात्रात चिकन व्यवसायातील प्राणिजन्य अवशेष आणि कचरा टाकणाऱ्या एका व्यावसायिकाला नगरसेवक व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. नगरसेवक दिलीप चव्हाण, दिलीप अमरे तसेच नगर परिषद मुख्य लिपिक जितेंद्र जाधव व महेश रहाटे यांनी ही धडक कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून कोंढे तड पुलावरून नदीपात्रात चिकन व्यवसायातील प्राणिजन्य कचरा फेकला जात असल्याच्या गंभीर तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या.

नदीपात्रात प्रदूषण आणि परिसरात दुर्गंधीचा त्रास

पुलावरून नदीपात्रात कचरा टाकल्यामुळे अर्जुना नदीचे पाणी प्रदूषित होत होते, तसेच संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या तक्रारींची दखल घेऊन नगरसेवक व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पुलावर पाळत ठेवून पाहणी केली असता, संबंधित व्यावसायिक नदीपात्रात चिकनची घाण टाकताना थेट आढळून आला. त्याला रंगेहात पकडून नगर परिषद प्रशासनाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.

पवित्र पुंडलिक मंदिर परिसरातही घाणीचे साम्राज्य

कोंढे तड पुलासोबतच शहरातील ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र अशा पुंडलिक मंदिर परिसरातही चिकन व्यवसायातील प्राणिजन्य अवशेष टाकले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अशा धार्मिक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी प्राणिजन्य कचरा टाकणे ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

कठोर दंडात्मक कारवाईची नागरिकांची मागणी

नदीपात्र आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा अशा प्रकारे प्राणिजन्य अवशेष अथवा कचरा टाकण्याचे धाडस कोणाचेही होऊ नये, यासाठी दोषी व्यावसायिकांवर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी राजापूरकर नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 12-08-2026