स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’वर मोठी कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून सातत्याने कडक कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून चालणाऱ्या अनैतिक वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला.
गोपनीय माहिती अन् बोगस ग्राहकाच्या मदतीने कारवाई
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास पाली (ता. जि. रत्नागिरी) येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’मध्ये परप्रांतीय व बाहेरील शहरातील महिलांना आणून ग्राहक उपलब्ध करून देत वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या आणि एका बोगस ग्राहकाच्या (Decoy Customer) मदतीने सापळा रचून लॉजवर अचानक छापा टाकला.
नेपाळच्या महिलेकडून चालवला जात होता व्यवसाय
छाप्यादरम्यान लॉजमधील एका खोलीत गीता छबी थापा (वय ३९ वर्षे, मूळ गाव- दयलेक, देश- नेपाळ; सध्या रा. मच्छीमार्केट बाजारपेठ, रत्नागिरी) ही महिला आढळून आली.
तपासात निष्पन्न झाले की, ही महिला आर्थिक लाभासाठी इतर महिलांना बाहेरील शहरांतून रत्नागिरीत बोलावून लॉजवर वेश्या व्यवसायासाठी ग्राहक उपलब्ध करून देत होती. ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेतून ती पीडित महिलांना ठराविक रक्कम देऊन स्वतः आर्थिक फायदा मिळवत होती. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे:
- रोख रक्कम: ₹ २,०००/- (बोगस ग्राहकाकडून घेतलेले)
- मोबाईल: Vivo कंपनीचा हँडसेट (किंमत ₹ ५,०००/-)
- इतर साहित्य: ५ सीलबंद निरोध पाकिटे
- एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ७,१००/-
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम १४३(२) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA), १९५६ चे कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सहभागी अधिकारी व अंमलदार:
- नेतृत्व: एलसीबी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे
- पथक: स.पो.नि. शबनम मुजावर (महिला सुरक्षा कक्ष), श्रेणी पो.उ.नि. संदीप ओगले, म.स.पो.फौ. स्वाती राणे, म.पो.हवा. छाया चौधरी, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. गणेश सावंत आणि चालक पो.शि. अतुल कांबळे.














