Ganpati Special Train Kadavai Halt: अखेर गणपती स्पेशल ट्रेनला कडवई स्थानकावर थांबा मंजूर!

CSMT – रत्नागिरी स्पेशल ट्रेन आता कडवई स्थानकावर थांबणार; आमदार शेखर निकम अन् ‘निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर रेल्वे’ ग्रुपच्या प्रयत्नांना यश

देवरुख:

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल ट्रेनला थांबा (Halt) मिळावा, या मागणीला अखेर यश आले असून मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून कडवई स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०११५३ / ०११५४ ला कडवई येथे थांबा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक ०११५३ / ०११५४ CSMT-रत्नागिरी गणपती स्पेशल ट्रेनला कडवई रेल्वे स्थानकावर हा विशेष थांबा देण्यात आला आहे.

गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई आणि उपनगरांतून कोकणात येतात. कडवई स्थानकावर थांबा नसल्याने आसपासच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. आता हा थांबा मिळाल्याने कडवई परिसर, संगमेश्वर तालुका आणि आजूबाजूच्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सततचा पाठपुरावा अन् लोकप्रतिनिधींचे सहकार्य

कडवई स्थानकावर गणपती स्पेशल गाडीला थांबा मिळण्यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे रीतसर निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता.

या मागणीचे गांभीर्य ओळखून आमदार शेखर निकम यांनीदेखील कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन कडवई स्थानकावर थांबा देण्याची आग्रही मागणी केली होती. सर्व स्थानिक नागरिक, रेल्वे प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या एकजुटीमुळे व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मानले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 12-08-2026