१५ ऑगस्टला शिवसेना ठाकरे गट आणि युवासेनेचे अनोखे आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन
लांजा:
लांजा शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या वतीने अनोख्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ‘चिखल नांगरणी स्पर्धा’ भरवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला जाणार आहे.
या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे युवा तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के यांनी लांजा तहसीलदारांना रीतसर निवेदन सादर करून रस्त्यांच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?’ नागरिकांचा संताप
लांजा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ते कुलकर्णी-काळे वसतिगृह या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर शाळा, रुग्णालये, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती आणि विविध शासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्था आहेत.
दररोज विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार आणि हजारो वाहनांची या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. मात्र, पडलेल्या अथांग खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, ‘रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता?’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अपुऱ्या दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका वाढला
पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचत असल्याने अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे. यापूर्वीही या मार्गावर अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
हायवे विभाग, संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही परिस्थिती सुधारलेली नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा शहरात गर्दी वाढणार असल्याने, त्यापूर्वीच रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे मुजवावेत; अन्यथा १५ ऑगस्टला चिखल नांगरणी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 12-08-2026














