सुवर्ण व रजत पुरस्कारांचे वितरण; पात्र निर्यातदारांना विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे प्रशासनाचे निर्देश
रत्नागिरी:
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुकतालामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांचा गौरव करण्यासाठी सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांच्या ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारां’साठी विविध प्रवर्गातील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी पात्र असलेल्या निर्यातदारांनी आपले अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.
३४ सुवर्ण आणि ३२ रजत पुरस्कारांचे होणार वितरण
या राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारांतर्गत विविध प्रवर्गांमध्ये मिळून एकूण ३४ सुवर्ण आणि ३२ रजत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथम पुरस्कार (सुवर्ण) प्राप्त करणाऱ्या विजेत्यास रुपये ५१ हजार रोख व प्रशस्तीपत्र देण्यात येईल, तर द्वितीय पुरस्कार (रजत) प्राप्त करणाऱ्यास रुपये २५ हजार रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कारासाठी पात्र ठरणाऱ्या क्षेत्रांची व घटकांची व्याप्ती
या पुरस्कारासाठी निर्याताभिमुख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), व्यापारी निर्यातदार, ट्रेडिंग हाऊस, एक्सपोर्ट हाऊस, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उत्पादक निर्यातदार तसेच अभियांत्रिकी व्यतिरिक्तचे निर्यातदार अर्ज करू शकतात.
याशिवाय, विविध उत्पादन क्षेत्रांतील निर्यातदारांना यात सहभागी होता येईल:
रत्न व दागिने, इलेक्ट्रॉनिक व विद्युत उत्पादने
अभियांत्रिकी व वाहन उद्योग, रसायने व संलग्न उत्पादने
औषध निर्मिती, सौंदर्यप्रसाधने व प्लॅस्टिक उत्पादने
लोखंड व पोलाद, वस्त्रोद्योग व चामड्याशी संबंधित उत्पादने
कृषी प्रक्रिया उद्योग, मत्स्य व सागरी उत्पादने
IT व ITES, पर्यटन, आदरातिथ्य व वेलनेस, शैक्षणिक क्षेत्र
पायाभूत सुविधा, बांधकाम, फिनटेक, BFSI आणि मीडिया व मनोरंजन
पात्रता निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) घटकांसाठी परकीय चलनाची आवक लक्षात घेता निर्यातीचे एकूण FOB (Free on Board) मूल्य किमान रुपये २ कोटी असणे आवश्यक आहे. याशिवाय, निर्यातीचे उत्पादनाशी असलेले गुणोत्तर, निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ, नवीन बाजारपेठांचा विकास, नवीन उत्पादनांची निर्यात, आव्हानात्मक परदेशी बाजारपेठेत मिळवलेला यशस्वी प्रवेश आणि हरित उपक्रमांचा अवलंब हे निकष मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील.
पात्र निर्यातदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज ३१ ऑगस्टपूर्वी diexport@maharashtra.gov.in आणि didic.ratnagiri@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवायचे आहेत. विहित नमुन्यातील अर्ज व सविस्तर माहितीसाठी संबंधितांनी ‘जिल्हा उद्योग केंद्र’ कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 12-08-2026














