‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’कडून सर्व्हेक्षण प्रसिद्ध; महाराष्ट्रातील केवळ ४ अधिकाऱ्यांना स्थान
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या नावाचा समावेश ‘फेम इंडिया’ (Fame India) आणि ‘एशिया पोस्ट’ (Asia Post) यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील १०० सर्वोत्कृष्ट पोलीस प्रमुखां’च्या (Top 100 District Police Chiefs) प्रतिष्ठित यादीत करण्यात आला आहे. या यादीत संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांना स्थान मिळाले असून, नितीन बगाटे यांच्या या यशामुळे रत्नागिरी पोलीस दलासह संपूर्ण रत्नागिरीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
कडक छाननी आणि विविध निकषांच्या आधारे निवड
भारतात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या शेकडो जिल्हा पोलीस प्रमुखांमधून सर्वोत्कृष्ट १०० नावांची निवड करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि बहुस्तरीय होती. अधिकृत डेटा, प्रशासकीय नोंदी, मीडिया रिपोर्ट्स, तज्ञांचे मत, सार्वजनिक माहिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील (Ground-level) अभिप्राय यांच्या आधारे खालील प्रमुख निकषांवर ही निवड करण्यात आली आहे:
- गुन्हेगारी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था: गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळणे.
- नागरिकस्नेही पोलीसिंग (Citizen-Centric Policing): जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण करून पारदर्शक व लोकाभिमुख काम करणे.
- संकट व्यवस्थापन व नेतृत्व: दबावाखाली अचूक निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि आपत्कालीन स्थितीत प्रभावी संकट व्यवस्थापन.
- सार्वजनिक प्रतिमा: पोलीस दलातील सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे.
रत्नागिरीतील उल्लेखनीय कार्य आणि जनतेचा विश्वास
रत्नागिरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि आव्हानात्मक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने कारवाई करण्याला नितीन बगाटे यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.
सुरक्षिततेची ही भावना शिक्षण, व्यवसाय, उद्योग आणि दैनंदिन सामाजिक जीवनाला गतिमान ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. हा बहुमान केवळ पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाची दखल नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.













