Ratnagiri Purnagad Ambulance Accident: गावखडी येथे रुग्णवाहिकेची टेम्पोला धडक; गुन्हा दाखल

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रत्नागिरी:

Ratnagiri Purnagad Ambulance Accident News प्रकरणी निष्काळजीपणे रुग्णवाहिका (Ambulance) चालवून समोरील टेम्पोला धडक देणाऱ्या चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील घाटकोपर येथील फिरोज ताहीर अली आलम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कशेळी ते गावखडी जाणाऱ्या रस्त्यावर गावखडी-बौद्धवाडी येथील एसटी स्टॉपच्या पुढे घडली.

निष्काळजीपणामुळे समोरासमोर धडक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रुग्णवाहिका चालक फिरोज ताहीर अली आलम (रा. रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर ईस्ट, मुंबई) हा आपली रुग्णवाहिका (क्र. MH-05 EL 1821) घेऊन कशेळीकडून गावखडीच्या दिशेने जात होता. गावखडी-बौद्धवाडी रस्त्यावरील एसटी स्टॉपच्या पुढे आले असता, चालकाने आपल्या ताब्यातील रुग्णवाहिका भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या टेम्पोला (क्र. MH-09 GJ 3542) जोरदार धडक दिली.

दोन्ही वाहनांचे नुकसान; पोलिसांत तक्रार

या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, रुग्णवाहिका आणि टेम्पो या दोन्ही वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वीर यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित रुग्णवाहिका चालक फिरोज आलम याच्याविरुद्ध रस्ता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुर्णगड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 13-08-2026