उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत देसाईंचे प्रतिपादन; आगामी काळात जाधवांवर राज्यस्तरीय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचे संकेत
चिपळूण: शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक करत ‘भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे,’ असे सूचक वक्तव्य केले आहे. भास्कर जाधव यांनी तळागाळापासून पक्षासाठी संघर्ष केला असून अन्याय-अत्याचारांना तोंड देत संघटना खंबीरपणे उभी केली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तर आपल्या सर्वांनाच आनंद होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार
उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. या बैठकीला शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते विजय कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, भास्कर जाधव यांच्यावर केवळ रत्नागिरी किंवा कोकणाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पक्ष नेतृत्वाचा विचार केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात यश मिळवण्याचा आहे. त्यामुळे आगामी काळात भास्कर जाधव यांच्याकडे पक्षाकडून अधिक महत्त्वाची आणि व्यापक जबाबदारी सोपवली जाईल.
राज्य सरकारवर आणि उद्योगांच्या स्थलांतरावर निशाणा
महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत जात असल्याचा गंभीर आरोप करत सुभाष देसाई यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. उद्योगांचे विस्तार प्रकल्पही इतर राज्यांकडे वळत असून शासन या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे ते म्हणाले. इतर राज्ये प्रगतीपथावर असताना महाराष्ट्र सरकारने तातडीने जागे होऊन राज्यातील उद्योग टिकवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजकीय घडामोडी आणि आगामी रणनीती
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यांवर भाष्य करताना देसाई यांनी सांगितले की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याला व्यापक राजकीय दृष्टिकोन ठेवून पुढे जायचे आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून घडलेला शिवसैनिक आजही तितकाच खंबीर आहे. कोकणात आणि विशेषतः उत्तर रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला अत्यंत पोषक वातावरण असून जनतेच्या मनात सध्याच्या परिस्थितीबद्दल तीव्र खदखद आहे. आगामी काळात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकेल, असा ठाम विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 22-08-2026














