Khed Khednaika Road Pothole: महाडनाका परिसरातील खड्डा ठरतोय जीवघेणा; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पावसामुळे खड्ड्यातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज येईना; नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर खेडवासीयांचा तीव्र संताप

खेड: खेड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या महाडनाका परिसरात भरणे येथून खेडकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पडलेला मोठा खड्डा सध्या वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने त्याची खोली नेमकी किती आहे, याचा कोणताही अंदाज दुचाकीस्वारांना येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक

या मुख्य मार्गावरून दिवसभर असंख्य वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावर अचानक समोर येणाऱ्या या मोठ्या खड्ड्यात पाणी भरलेले असल्याने चालकांची दिशाभूल होत आहे. खड्ड्यातून गाडी गेल्यानंतर दुचाकीचे नियंत्रण सुटून चालक खाली पडण्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतामुळे आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे चालकांची मोठी तारांबळ उडत आहे.

नगरपरिषद व बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

महाडनाका परिसरातील या गंभीर समस्येकडे खेड नगरपरिषद अथवा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. केवळ खड्डा बुजवून न थांबता पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?

एखादा मोठा भीषण अपघात होऊन निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून हा खड्डा बुजवावा आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी खेड शहरातून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 22-08-2026