प्रवाशांची वाहतूक करण्याच्या वादातून टेम्पो ट्रॅव्हल्स चालकावर बांबूने हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल
दापोली: प्रवाशांची वाहतूक करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करत कटर ब्लेड दाखवून जीवे मारण्याची गंभीर धमकी दिल्याचा प्रकार दापोली तालुक्यातील फणस नाका येथे घडला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवासी उतरवून विश्रांतीसाठी जाताना घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश दत्ताराम शिगवण (वय ३६, रा. मगीज मांडवकरवाडी, ता. दापोली) असे जखमी ट्रॅव्हल्स व्यावसायिकाचे नाव आहे. ते २० ऑगस्ट रोजी सकाळी स्वतःच्या टेम्पो ट्रॅव्हल्समधून मुंबईहून प्रवासी घेऊन दापोलीत आले होते. प्रवाशांना नियोजित स्थळी उतरवल्यानंतर ते आपल्या वाहनाने विश्रांतीसाठी उमरवरे येथील मित्र प्रभाकर वानकर यांच्या घरी जाण्यास निघाले होते.
सकाळी ११:४५ च्या सुमारास फणस नाका येथे त्यांनी आपली टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यावेळी तेथे आलेल्या रवी किरण उके (रा. फणस, ता. दापोली) या दुसऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने “या ठिकाणी गाडीत प्रवासी भरायचे नाहीत आणि वाकवली गावाच्या पुढे तू यायचं नाही,” असे म्हणत सतीश शिगवण यांच्याशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली.
बांबूने मारहाण आणि कटर ब्लेडचा धाक
फिर्यादी शिगवण यांनी “तू उगाच माझ्याशी भांडू नको,” असे सांगितल्याचा राग आल्याने संशयित आरोपी रवी उके याने हातातील बांबूने त्यांच्या दोन्ही पायांवर, कंबरेत, मांडीवर, पोटरीवर, दोन्ही हातांवर आणि डोक्यात जोरदार मारहाण केली. या मारहाणीत शिगवण गंभीर जखमी झाले. आरोपीने एवढ्यावरच न थांबता शिवीगाळ करत हातातील कटर ब्लेड अंगावर धावून नेत ठार मारण्याची धमकी दिली.
दापोली पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
या हिंसक घटनेनंतर जखमी सतीश शिगवण यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ चे कलम ११७(२), ३५१(२), ३५२, १३१ (जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार ३२४, ५०६, ५०४, ३५२) अन्वये आरोपी रवी किरण उके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 22-08-2026














