Ratnagiri Special Jail Prisoner Death: रत्नागिरी विशेष कारागृहातील न्यायाधीन कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू

दम्याचा त्रास आणि अशक्तपणामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात होते दाखल; उपचारादरम्यान सोडला प्राण

रत्नागिरी

रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक गौराजी गमरे (वय ६५, रा. कळकवणे, बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत कैद्याचे नाव आहे.

अस्थमाच्या त्रासामुळे रुग्णालयात केले होते दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गमरे हे रत्नागिरी विशेष कारागृहात असताना त्यांना अचानक अस्थमाचा (दम्याचा) त्रास आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांची खालावलेली प्रकृती लक्षात घेता ११ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० वाजता पोलीस पथकाच्या कडक सुरक्षेत त्यांना रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयातील मेडिसीन विभागात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान खालावली प्रकृती

गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अखेर उपचारादरम्यान २५ ऑगस्ट रोजी रात्री ८:४२ वाजता त्यांचा मृत्यू झाला, असे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे यांनी घोषित केले.

कारागृहातील कैद्याच्या मृत्यूमुळे प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांनुसार आवश्यक ती पुढील वैधानिक कारवाई करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:46 27-08-2026