अग्निशमन दलातील फायरमन आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणार गणवेश; देकार मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार
रत्नागिरी:
रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजात अधिक शिस्त आणि सुसूत्रता आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील फायरमन आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आता अधिकृत गणवेश (युनिफॉर्म) मिळणार आहेत. यासंदर्भातील ठराव नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
देकार मागवून होणार गणवेशाची शिलाई
कर्मचाऱ्यांना दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून गणवेश शिवून देण्याकरिता लवकरच देकार (निविदा/टेंडर) मागवले जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना गणवेशांचे वाटप केले जाईल.
नूतन प्रशासकीय इमारतीत दिसणार शिस्तबद्ध वातावरण
रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत कामकाजाला सुरुवात झालेली असताना, या निर्णयामुळे आता प्रशासकीय इमारतीमध्ये गणवेशधारी कर्मचारी वर्ग पाहावयास मिळणार आहे. यामुळे नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांना कर्मचारी ओळखणे सुलभ होईल आणि कार्यालयीन शिस्त वाढीस लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 27-08-2026













