अंगणवाडी व शाळांमधील बालकांवर मोफत वैद्यकीय उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रिया; जिल्हा आरोग्य विभागाची कामगिरी
रत्नागिरी :
जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’द्वारे ग्रामीण भागातील अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७५ हजार बालकांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
आरोग्य तपासणीची सविस्तर आकडेवारी
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार विविध टप्प्यांतील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
- अंगणवाडी तपासणी: २,९१३ पैकी २,२९३ अंगणवाड्यांची (७९%) तपासणी पूर्ण. एकूण ५१,६१८ बालकांपैकी ३९,३४२ मुलांची आरोग्य तपासणी झाली (६६%).
- शालेय बालकांची तपासणी: २,९३१ पैकी १,१८५ शाळांची (४०%) तपासणी पूर्ण. एकूण १,९०,३०४ विद्यार्थ्यांपैकी ३४,८८० विद्यार्थ्यांना (१८%) तपासणीचा लाभ मिळाला.
- औषधोपचार व संदर्भ सेवा: तपासणीदरम्यान ३,५८५ अंगणवाडी व ३,३७८ शालेय विद्यार्थ्यांना जागेवरच औषधोपचार देण्यात आला. तसेच पुढील उपचारांसाठी अंगणवाडीतील ८४७ आणि शाळांमधील ९६६ विद्यार्थ्यांना संदर्भित करून अनुक्रमे ८६५ व ९३३ जणांवर योग्य उपचार सुरू करण्यात आले.
६६ इतर शस्त्रक्रिया आणि ६ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
२०२६-२७ च्या अहवालानुसार, केवळ सामान्य आरोग्य तपासणीच नव्हे तर विविध आजारांनी ग्रस्त बालकांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या आहेत:
- इतर शस्त्रक्रिया: अंगणवाडीतील ३६ आणि शाळांमधील ३० अशा सर्व ६६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या.
- हृदय शस्त्रक्रिया: अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हृदय शस्त्रक्रियेसाठी अंगणवाडीतील ५ आणि शाळांमधील २ अशी एकूण ७ बालके पात्र ठरली होती. त्यापैकी ६ बालकांच्या (अंगणवाडी ४, शाळा २) हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. उर्वरित १ बालकावर वैद्यकीय औषधोपचार सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 27-08-2026














